ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
Anjali Takke
आंबा : वैदया भाग्यश्री, मोक्षदा नूलकर - ज्ञानांगण - mokshda dnyanangan संस्कार वर्ग
6 minutes Posted Jul 25, 2021 at 5:42 pm.
0:00
6:45
Download MP3
Show notes

आंबा

 संपूर्ण भारतभरात सर्वांना प्रिय सर्वत्र प्रसिद्ध असे कोणते फळ असेल तर ते आंबा. आज आपण या आंबा वृक्षाचे महत्त्व बघणार आहोत. याच्या गुणांमुळे आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते. महाकवी कालिदासापासून अनेक संस्कृत कवी, लेखक, नाटककार यांनी आंब्याचा अतिशय रसिकतेने आपल्या साहित्यात उल्लेख केला आहे. भारतीयांच्या ओठांवर आंबा हे नाव येताच उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या यथेच्छ आमरस सेवनाच्या गोड आठवणी जाग्या होतात. आंबा हा खूप मोठा वृक्ष नैसर्गिकरीत्या सिक्कीम, आसाम,सातपुडा, सह्याद्री इत्यादी डोंगर पर्वतरांगांमधील जंगलात आढळतो पण पोर्तुगीजांनी त्यांच्याकडील अल्फान्सो या जातीचे कलम येथील कोकण प्रांतात करायला सुरुवात केल्यावर त्याच्या गोड चवीमुळे आपण जास्त करून

कोकणपट्टीत ह्याच कलमी जातीची लागवड करू लागलो. हापूस हे नामकरण सुद्धा केलं. त्यालाच प्रतिष्ठा मिळाली आणि आयुर्वेदात उल्लेखिलेला खरा आंबा हे फळ कमी दर्जाचे ठरले.आज आपण आंब्याच्या अनेक प्रजाती गमावून बसलो आहोत. यामुळे आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आपले अपरिमित नुकसान होत आहे. स्थानिक प्रजाती नष्ट झाल्यास  त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व जैववैविध्याला धोका पोहोचून पर्यावरणाची सुदृढता कमी होते म्हणजेच आपल्या भोवतीच्या निसर्गातील उपद्रवी जीवजंतू, किडे, कीटक यांच्यावर नैसर्गिकरीत्या नियंत्रण राखण्यास मोलाची कामगिरी बजावणारे अनेक जीव कमी होतात,नाहीसे होतात मग त्या उपद्रवी जीवांची संख्या वाढून माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. उत्तम उदाहरण आज-काल वाढलेले अनेक नव्या प्रकारचे रोग व जिवाणू ,विषाणू यांनी घातलेला धुमाकूळ.


स्थानिक हवामान माती,पाणी इत्यादी मुळे आंब्याच्या प्रजाती निर्माण होतात. फळांच्या विविध नैसर्गिक प्रजाती वेगवेगळे पोषण पुरवत असतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारक क्षमता चांगली राहते. वृद्धावस्था लवकर न येणारे काही घटक या फळांमध्ये नैसर्गिकरित्या असतात जे कलमी आंब्यात नसतात. उन्हाळा या काळात उष्मा वाढल्यामुळे शरीराची शक्ती व पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते. या काळात देशी प्रजातीचे रायवळ आंबे रसाळ व पौष्टिक गुणांनी या दोन्ही गोष्टींची पूर्तता करतात. सृष्टी मातेने या काळात आपल्याला खोलवरचे पृथ्वीच्या पोटातले पाणी आंबट-गोड स्वरूपात फळांच्या रुपाने देऊन आपल्या तहान व भुकेची सोय केलेली असते. घट्ट गराच्या आंब्याने अंगात उष्णता भरून अनेकदा गळवे,फोड इत्यादी त्रास होतात. शरीराचे संतुलन ढासळते म्हणून प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रजाती मग त्या गोवंशाच्या असोत की निसर्गातील वृक्षवल्ली, औषधी वनस्पती यांच्या किंवा अन्नधान्य पीक प्रजाती असोत त्यांचे संरक्षण संवर्धन आज आत्यंतिक आवश्यक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे . दरवर्षी पिकलेल्या देशी आंब्याचे उन्हाळ्यात सेवन केल्यास वर्षभरासाठी भरपूर बल आणि आरोग्यप्राप्ती होते.हे पित्त कमी करते .आंब्याची पोळी उन्हात रस सुकवून करतात. तीसुद्धा पचायला हलकी व पौष्टिक असते. कच्च्या कैरीचे जिरेपूड, मीठ ,साखर घालून सरबत केल्यास घामावाटे बाहेर पडणारे उपयुक्त घटक परत शरीराला मिळतात व तरतरी येते.

आंब्याला आपल्या धार्मिक विधींमध्ये तसेच शुभ प्रसंगी खूप महत्त्व असते. आंब्याचे तोरण मन प्रसन्न करते. त्यासाठी आपण आपल्या घराजवळ आंब्याच्या कोयीपासून छोटी रोपे तयार करायचा प्रयत्न करायला पाहिजे मग ही रोपे आदिवासी भागात वृक्षारोपणासाठी आपण दान करू शकतो.

मुलांनो याच्या स्थानिक प्रजातींची माहिती मिळवून आपल्या परसदारी किंवा शेतात जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करणार ना?

लिखाण : वैद्या भाग्यश्री विजय टिळक