ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
Anjali Takke
करुणाष्टके - नीरजा करंदीकर - karunashtak - neerja karandikar - dnyanangan ज्ञानांगण
3 minutes Posted Aug 7, 2021 at 4:29 am.
0:00
3:14
Download MP3
Show notes

समर्थ रामदासांची करूणाष्टके


करुणाष्टके’ असं म्हटल्याक्षणी ‘अनुदिन अनुतापे तापलो रामराया’ किंवा ‘दासा मनी आठव विसरेना, तुजवीण रामा मज कंठवेना’ या कवितांचे चरण मनात घोळू लागतात. उपासनेच्या, साधनेच्या काळात पंचवटीच्या रामाच्या सन्मुख उभे असलेले समर्थ डोळ्यासमोर दिसू लागतात; आणि मग रामाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला भाव, त्यातून जन्मलेली करुणा आणि त्या करुणाकल्लोळात आकंठ बुडलेले समर्थांचे शब्द सहजपणे आठवू लागतात.

सुरुवातीस एक गोष्ट नमूद करते, करुणाष्टके हे समर्थांनी दिलेले शीर्षक नाही. तसेच, अष्टक या संख्यावाचक किंवा पदवाचक विशेषणाचा या पदांशी तसा काही संबंध नाही.

समर्थांनी जिथे चतु:समासी, पंचमान, एकवीस समासी अशी संख्यावाचक विशेषणे योजिली आहेत, तिथे संख्येचे बंधन पाळले आहे; संख्यावाचक पद प्रथम घेतले आहे. करुणाष्टकात मात्र संख्यावाचक पद दुसरे आहे.

दुसरे असे, एकूण करुणाष्टकांची संख्या आठ आहे असे नाही किंवा प्रत्येकातील पदसंख्या आठ आहे असेही नाही. यामुळे संख्यावाचक म्हणून ‘अष्टक’चा अर्थ घेता येत नाही.

या कवितेने देवाला आळवताना अष्टसात्त्विक भाव जागृत होतात या अर्थाने याला करुणाष्टक असे म्हणता येईल. अष् म्हणजे धावणे अशी एक उपपत्ती देताना ‘अषति इति अष्टकम्’ असे म्हटले आहे. म्हणजे, करुण भावाने देवाकडे केलेला धावा या अर्थाने ही करुणाष्टके आहेत, असंही म्हणता येईल.

थोडक्यात, आठ या संख्येपेक्षा त्यातील भाव अधिक महत्त्वाचा आहे.

करुणाष्टक म्हणजे समर्थांची विशुद्ध भावकविता आहे. मनात दाटून आलेलं अपार कारुण्य ही या कवितेची लेखन प्रेरणा आहे. ज्या प्रभू श्रीरामासाठी सर्वस्व अर्पण केलं, तो राम भेटत नाही या विचाराने मनाची झालेली तळमळ त्यात आहे. व्याकुळता आहे.


‘देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांसी तुटी’ या ब्रीदासाठीच बारा-पंधरा वर्षांच्या बालनारायणाने जिवलगांचा, घरादाराचा त्याग केला. अनंत आकाश मोकळं झालं! मागचे सगळे पाश त्याने विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक सोडले आणि एकच नातं जोडलं... विश्वात्मक नारायणाशी!


उपासना शोधून पाहिली

ती विश्वपाळिती झाली...


त्याने उपासनेचाही शोध घेतला. कुणाच्या उपदेशाने किंवा अनुमानाने नाही, तर प्रत्यक्ष प्रमाणाने त्या विश्वपालक रामाशी अनुसंधान साधलं. आपल्या वैयक्तिक साधनेचा, उपासनेचा मार्ग निश्चित केला. बद्धावस्था मागे सरली... मुमुक्षुपण सुरू झालं...

पंधरा वर्षांच्या नारायणाचं उपासना पर्व सुरू झालं. कठोर तपश्चर्या, अनुष्ठान, अत्यंत संयत असा दिनक्रम, बलोपासना, वाचन-मनन असा काळ सुरू झाला. ‘विवेके क्रिया आपुली पालटावी’ हे बाल नारायणाला लहान वयात उमगलं होतं.

कठोर साधना सुरू होती. या विवेक, वैराग्यपूर्ण साधनेनंतर राम नक्की भेटेल याविषयी त्याला संशय नव्हता; पण... असं असूनही... कधी तरी त्याचं बालमन खूप कातर होत होतं... अगदी स्वाभाविकपणे...!

आपल्या हातून काहीतरी निसटतं आहे, दुरावतं आहे, रामाशिवाय जिवलग असं दुसरं कोणीही नसताना रामभेटीची आशा अंधुक होते आहे... ही साधकावस्थेतली करुण मनोवस्था त्या बालमनाला व्यापून आहे.

हा आर्त, करुण भाव घेऊन करुणाष्टकं जन्मली. करुण रसाचा स्थायीभाव असणाऱ्या वियोगातून करुणाष्टकं जन्मली. नश्वराच्या प्राप्तीकरिता सगळं जग व्याकुळ असताना, ईश्वराच्या प्राप्तीकरिता व्याकुळ असलेल्या बाल नारायणाच्या मुखातून करुणाष्टकं जन्मली.


म्हणूनच करुणाष्टकं ही समर्थांच्या काव्यशक्तीची आणि भावविश्वाची साक्ष पटवून देणारी कविता ठरली.

करुणाष्टकातून खूप काही उमगतं... पण आज करुणा, अष्टक याबद्दल आणि त्यांच्या जन्मकथेबद्दल सांगून थांबते!

- डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर

(लेखिका संतसाहित्याच्या अभ्यासक आहेत.)