निसर्ग साक्षर- देशी वृक्ष संपदा - १
पिंपळ
आपल्या सर्वांना माहीत आहे की अश्वत्थ वृक्ष किंवा पिंपळ हा आपल्या सर्वांच्या संस्कारांमध्ये रुजलेला वृक्ष आहे. भारतभर प्रचंड भाषा, वंश, हवामान, वृक्ष, प्राणी,खाद्यसंस्कृती असे वैविध्य असूनही वड, पिंपळ इत्यादीना सर्वत्र पूजनीय मानले जाते. त्याचे अनेकविध उपयोग केले जातात.
भगवद्गीतेसारख्या धार्मिक ग्रंथांपासून ते चारकसंहितेसारख्या औषधी, आरोग्य इत्यादी साठी निर्माण झालेल्या प्राचीन ग्रंथपरंपरा इत्यादींमध्ये या पिंपळ, वडाचा उल्लेख येतो. बौद्ध धर्मामध्ये मानले जाते कि भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ध्यानमग्न अवस्थेत असताना ज्ञानप्राप्ती झाली. बुद्ध पौर्णिमेला पिंपळाचे पूजन केले जाते.
आपल्या येथील प्रसिद्ध राजे, चक्रवर्ती सम्राट यांनी वाटसरूंसाठी महामार्गांवर वड पिंपळाचे रोपण करण्याचे आदेश दिलेले जुन्या कागदपत्र, शिलालेख इत्यादी पुराव्यांमध्ये दिसते. त्यामुळे सर्व भारतभर असे अनेक हजारो विशाल वृक्ष आपल्याला आढळतात.
महाराष्ट्रात गणेशोत्सवामध्ये ज्या एकवीस पत्री गणेश पूजनासाठी वापरल्या जातात त्यात एक पिंपळ आहे.
पिंपळ हा वृक्ष कायम भरपूर पानांनी भरलेला असतो. आधुनिक विज्ञानानुसाही हा वृक्ष हवेतून भरपूर कार्बनडायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडतो आणि हवा शुद्ध होते. याच्या शीतल छायेमध्ये म्हणूनच वाटसरूंना ताजेतवाने वाटते.
माणसांएवढाच आनंद हा इतर प्राणी पक्षी किडे कीटक जीवजंतू यांनाही देतो. पिंपळाच्या खांद्यावर लगडलेली छोटी छोटी फळ सदृश फुले ही तर या सर्व जीवसृष्टीचे पोट भरायला समर्थ आहे. म्हणूनच अन्नासाठी माणसांसारखे पैसे मिळवण्याची गरज इतर कोणत्याही जीवाला भासत नाही. जोपर्यंत हे महावृक्ष या पृथ्वीतलावर आहेत, ही जीवसृष्टी येथे सुखाने नांदू शकते.
ग्रंथात वर्णन केले आहे की पिंपळपानावर बुद्धिदेवता वास करते. त्यामुळेच हा वृक्ष आसपास असेल तर मनावर खूप सकारात्मक परिणाम होतो. वातावरणातील नकारात्मक भाव नाहीसे होऊन ते पवित्र, शुद्ध होते.
याच्या पानावर तुपभात जेवल्यास मुलांची बुद्धी तेज होतेच पण वाचादोषही जातात. आयुर्वेदात याला बोधिवृक्ष संबोधतात. तसेच याला स्थिरीवृक्ष असेही संबोधतात.वड उंबर इत्यादी इतर स्थिरीवृक्ष आहेत. आजकाल मनाची चंचलता व उपभोग वृत्ती खूप वाढली आहे. तर या वृक्षांची लाख किंवा चीक ( वड ) किंवा त्यातून वाहणारे पाणी ( उंबर ) हे शरीर व मनाला शांत करू शकते.
आहारविहारातील चुकांमुळे जे गर्भोत्पतिकर भाव बिघडतात त्यांना सुधारून उत्तम संतती हे वृक्ष प्रदान करतात. शरीरावरील रोगाची काळी छाया नाहीशी करून शरीर तेज:पुंज करतात.
पिंपळाची लाख उत्तम टॉनिक आहे. सुका खोकला, दमा, निद्रानाश यावर मुलांना विशेषकरून उपयुक्त आहे. आयुर्वेदातील प्रसिद्ध चंदनबलालाक्षादि तैल हे तर लहान बाळांचा उत्तम शारीरिक मानसिक बौद्धिक विकास घडवण्यासाठी प्रत्येक घरात पाहिजेच.
याच्या छोट्या फांद्या, काड्या दंतमंजनासाठी पूर्वी वापरल्या जात. याने दात दृढ होतात. भारद्वाज ऋषींच्या गोत्रामध्ये पिंपळपानाचा सर्वांगीण उपयोग सांगितला आहे.
वड पिंपळ या झाडांच्या खालची माती ही उपयुक्त जिवाणू नी अत्यंत समृद्ध असते त्यामुळे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी शेतामध्ये त्याचा विरजण म्हणून वापर करून जमिनीची सुपीकता वाढवू शकतात
असा हा आपला अस्सल देशी वृक्ष पिंपळ .... अश्वत्थ
सौ मोक्षदा शुधान्शु नूलकर, वैद्य भाग्यश्री टिळक
🌻 भारतीय गुरुकुल परिवार 🌻



