अक्षरभान-निकिता भागवत
अक्षरभान-निकिता भागवत
Maau & Bunny show by Arnav Bhagwat
Feb 22, 2021 · 11 min

लुप्त तारे

MP3
*लुप्त तारे*
मराठी सारस्वताच्या नभांगणात असंख्य तारे युगानयुगं चमकतायेत. तारेही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही लखलखणारे, काही लुकलुकणारे, काही मिणमिणते, काही निस्तेज तर काही कालौघात वेळेआधीच लुप्त होणारे. मराठी साहित्याचं नभांगणही अशा असंख्य वेगवेगळ्या तारे तारकांनी प्रकाशमान आहे. त्यात प्रदीर्घ आयुष्य आणि साहित्यिक जीवन लाभलेले साहित्यिक, काही उशीराने उदयास आले पण नंतर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत प्रदीर्घ काळ साहित्यशारदेची सेवा करणारे, तर काही उदयाच्या क्षितिजावर नुकतेच चमकू लागलेले परंतु काळाच्या मगरमिठीत लुप्त झआलेले असे अनेक अक्षरनंदन आहेत.
वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, इंदिरा संत, दुर्गाबाई भागवत, मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे, शांता शेळके, विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, श्री. ना. पेंडसे हे साहित्यिक दीर्घायुषी होते. साधारण ८०-९० वर्षांचं आयुष्य आणि ५० ते ६० वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा त्यांनी अक्षरांची केली. या काळात स्वत:चा असा एक वाचकवर्ग तयार केला, शैली विकसित केली, आणि विविध साहित्य प्रकारांत विपुल लिखाण केलं. दीर्घकाळ वाचकांशी समरसून आपलं लेखन त्यांच्यासमोर ठेवताना ते एक विचार वाचकांना देऊ शकले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्ग दाखवेल असं साहित्य त्यांनी निर्माण केलं. त्यामुळे अशा साहित्यिकांचं एकेक युग म्हणता येईल, इतकं त्यांनी आपल्याला दिलं.
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा वरदहस्त मराठी वाचकांच्या माथ्यावर जवळपास पाच दशकं फिरत राहिला. ८७ वर्षांच्या समृद्ध जीवनात कुसुमाग्रजांनी विपुल लेखन केलं. प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक अशा विविध रुपांत ते रसिकांच्या समोर येत राहिले. साहित्यिकाला सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, हा विचार त्यांनी सदैव आचरणात आणला होता. त्यामुळेच कुसुमाग्रजांची कविता ही क्रांतीची कविता आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत त्यांची कविता धुक्यातून वाट दाखवित राहिली. १९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिरात झालेल्या सत्याग्रहात ते सक्रिय सहभागी झाले, आणि त्यांची कविता ही क्रांतीची कविता झाली. ‘ते सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न आहेत’, असं म्हटलं जातं ते उगीच नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४२च्या लढ्याच्या दरम्यान लिहिली गेलेली ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ ही कविता त्यावेळी राजबंदी असलेल्या क्रांतिकारकांच्या मनातला हुंकार होता. सगळ्याच टीकाकारांनी जिला गौरवलं अशी ही कविता त्यावेळी राजकीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तर एखाद्या स्तोत्रासारखी पाठ केली होती. ती कविता संध्याकाळच्या एकत्रिकरणात सगळेच स्वातंत्र्यसैनिक तरुंगात सामूहिकरित्या म्हणत, अशी आठवण ना. ग. गोरे यांनी सांगितली आहे.
बा. भ. बोरकरांनी या क्रांतिगीताचा पोर्तुगीज भाषेत अनुवाद केला आणि त्यांच्या मातृतुल्य असलेल्या एका पोर्तुगीज वृद्धेला जेव्हा ऐकवला तेव्हा तिने दिलेली ‘ही कविता फ्रेंच राष्ट्रगीताहूनही श्रेष्ठ आहे’ ही दाद त्या कवितेचं स्थान अधिक दृढ करते.
त्यानंतर ‘कणा’ ही कविता प्रचंड लोकप्रिय झाली. जगायला काय लागतं, याचं साधं उत्तर एका प्रसंगातून ही कविता देऊन जाते आणि वाचकाच्या मनाला हात घालते. हाच ऋषितुल्य कवी जेव्हा स्वातंत्र्याला ५० वर्षे लोटल्यानंतर देशाची, लोकांची, समाजाची पतीत अवस्था बघतो तेव्हा व्यथित होऊन ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ लिहून भावात्मकतेने लोकांची कानउघाडणी करतो. खरोखर थोर, अलौकिक आणि लोकोत्तर विभूती म्हणता येतील असे अनेक साहित्यिक मराठीला मिळाले.
मंगेश पाडगावकरांच्या कविता अशाच चुकलेल्यांना रस्ता दाखवणाऱ्या, रुसलेल्याला हसते करणाऱ्या आणि कठीण तत्वज्ञान सोपं करुन सांगणाऱ्या आहेत, असं मला वाटतं. या कवितांनी माझ्यासारख्या कित्येकांना जगण्याची दिशा, चालण्याचं बळ आणि स्वप्नांची उर्मी दिली असेल. महाविद्यालयात असताना, आवडत्या कविता एका डायरीत लिहिण्याचा मला छंद होता. मर्ढेकर, बोरकर, इंदिरा संत, सुर्वे, शांता शेळके, आरती प्रभू, पाडगावकर अशा कितीतरी कवींच्या कविता माझ्या हस्ताक्षरात लिहिण्यात मला विलक्षण आनंद व्हायचा. ती कविता मनाच्या अधिक जवळ जायची. असंच एकदा मी ‘बोलगाणी’ वाचता वाचता दोन-तीन कविता लिहून झाल्या आणि पुस्तक आधी पूर्ण करु आणि मग लिहू असा विचार मनात आला. शेवटी असं वाटलं की, अरे सगळं पुस्तकच संग्रही असायला हवंय. इतकी श्रीमंती या कवितांनी दिली. पाडगावकर वाचणं जसं सुखद असायचं तसंच त्यांना ऐकणंही. त्यांना खूपदा, खूप ठिकाणी ऐकता आलं हे मी माझ्या पिढीचं भाग्य समजते. शब्दांत बांधलेला भाव नेमकेपणानं श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर सादरीकरण, आवाजातला चढ-उतार, शब्दफेक, पॉजेस हे सगळं परफेक्ट जमून यावं लागतं. आणि सादरीकरणात तर पाडगावकर

This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.